देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५०% स्त्रिया आहेत मात्र अद्यापही मुलभूत अधिकारापासून वंचित आहेत ही वास्तवीकता आहे. स्त्रीवर होणाऱ्या या सर्व अत्याचाराचे, तिच्या दुःस्थितीचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाइतके परिणामकारक दुसरे साधन नाही. एका मुलीला शिकवणे म्हणजे अख्या कुटुंबाला शिकविण्यासारखे आहे. स्त्रियांना फक्त कुटुंबामध्येच नाही तर एकूण समाजातच दुय्यम स्थान आहे. आपल्या सामाजिक जडणघडणीमध्ये स्त्रीची भूमिका ही एकाच पद्धतीने रंगवलेली आढळते. भारत सरकारने सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शपथ घेतलेली आहे; पण, आशिया खंडात भारतात अजूनही मुलींच्या शिक्षणाचा आकडा सर्वात कमी दिसतो. २०११ च्या जनगणनेनुसार भारतातल्या पुरुषांचा साक्षरता दर ८२.१४ % तर महिलांचा साक्षरता दर ६५.४६ टक्के इतका आहे. ह्या अशिक्षिततेमुळे फक्त मुलीच्या जीवनावर परिणाम होत नाही तर त्यांच्या कुटुंबावर व देशाच्या उन्नतीवर त्याचा फार मोठा परिणाम होतो. वेगवेगळ्या अभ्यासावरुन असे लक्षात आले आहे की अशिक्षीत महीलांमध्ये बाळंतपणात मरणा-यांची संख्या जास्त आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा, अनारोग्य, आहाराची कमतरता इ. प्रश्न आहेत. तसेच, महिला सामाजिक-आर्थिक आणि राजकीय पातळीवर असक्षम राहते परिणामत: निरक्षरतेमुळे वैयक्तिक जीवनात तसेच देशाच्या विकासावर परिणाम होतो.
एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात ‘चूल आणि मूल’ एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली आणि मुलींना शिक्षणाची दारे उघडी होवून प्रगतीचा मार्ग मिळाला. तसेच “बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार कायदा-२००९” अन्वये सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण प्रदान करतो. परंतु असे असूनही सगळ्या मुली शाळेत जातातच असे नाही. प्राथमिक शाळेच्या नोंदणीच्या वेळी १०० मुलांमध्ये ५५ मुली असे व्यस्त प्रमाण दिसते. शिवाय घरामध्ये कुठलीही अडचण असो, सर्वात प्रथम घरी ठेवले जाते ते मुलीला. शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या ४ विद्यार्थ्यांपैकी ३ मुलीच असतात. मुलींची शाळा पुढे चालू राहिली तरी घरातील कामे, जबाबदाऱ्या सांभाळून तिला अभ्यास करावा. मुलीचे शिक्षण ८ वी पर्यंत कसेबसे होते. पण पुढची शाळा काहीवेळा घरापासून लांब असते किंवा काही पालक मुलामुलींची शाळा एकत्र असते म्हणून मुलीला शाळेत जाण्यापासून प्रतिबंध केल्या जातो. मुलीचे लग्न १८ वर्षांपूर्वी करू नये हे तत्त्वतः सर्वांना मान्य असते. परंतु व्यवहारात मात्र चित्र अगदी उलट दिसते. आजही ग्रामीण भागात विवाहाचे सरासरी वय १५-१६ वर्षे आहे. “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम” ने “जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक 2017” या शीर्षकाचा एक अहवाल जारी केला असून; त्यात असं म्हटलं आहे की, स्त्री-पुरुष आर्थिक समानतेत भारताची घसरण झाली आहे. भारत 144 देशांत तो 108 व्या स्थानावर आला आहे. 2016 सालच्या अहवालानुसार, भारताचं स्थान 87 वं होतं.
ह्या सर्व परिस्थितीमुळे “मुलींकडे” पाहण्याचा कुटुंबाचा, समाजाचा दृष्टीकोन बदलला. मुली ह्या कुटुंबाचा भार म्हणून पाहल्या जाते. समजल्या जाते. त्यामुळे मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याचे आपण पाहतो.
स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे.
महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास। करील ऐसे शिक्षण खास । जरी दिले जाईल त्यास । तरीच भावी जग पालटे ।२५।। महिलांचे उच्चतम शिक्षण । शिक्षणात असावे जीवनाचे स्थान ।। जीवनात असावे स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचे ॥२६॥
महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम मुलींना शिक्षणाच्या संधी निर्माण उपलब्ध करून समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर घात करणाऱ्या विघातक प्रवृत्ती अर्थात हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची अर्थात आपली सर्वांची जबाबदारी आहे.
जर आज आपण असे केले नाही अर्थात बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात आणले नाही, अंमलबजावणी केली नाही तर …..???
स्वतःपासून, कुटुंबापासून आजच-आत्ताच सुरुवात करू या. परिस्थिती सुधारलेली आपण पाहू शकु. आपल्या भावी जीवनातच.
डॉ. मधुकर गुंबळे
अपेक्षा होमिओ सोसायटी/Child Rights Alliance
(Email-apekshasociety@gmail.com, Mob. No. 9422190811)