मानवी हक्क हे स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि स्वत:ची प्रगती साधण्यासाठी हक्काची नितांत आवश्यकता असते. मात्र बाल अधिकाराची अहवेलना संदर्भात इतिहास साक्षी आहे या कोवळ्या कळ्यांचा उमलण्याचा अधिकार अबाधित राहावा, त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे करिता एक विचार प्रवाह जगभर पुढे आला आणि बालकांचे शारीरिक, लैंगिक, मानसिक, शैक्षणिक शोषण थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर “बाल हक्क संरक्षण आयोगाची” National Commission for Protection of Child Right स्थापना करण्यात आली आणि United Nations Convention on the Rights of the Child (UNCRC) बाल हक्क संहिता अन्वये ० ते १८ वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा आणि संरक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
मात्र, मुलांना स्वतःचा आवाज नसल्यामुळे सहजरीत्या मुले शोषणाला बळी पडतात. मानव अधिकार संघटनेच्या आकडेवारी नुसार वर्षभरात ३० ते ३५ हजार मुले हरविल्याची नोंद होते त्यापैकी दोन-तीन हजार मुलांचा शोध घेतला जातो. अनैतिक मानवी बाजार व मुलांचे हरवणे याचा फार जवळचा संबंध आहे. प्राप्त सरकारी आकडेवारीनुसार २०१२ साली भारतात मानवी तस्करीच्या ३,५५४ केसेस नोंदवल्या गेल्या, ज्यात २००८ साली नोंदवलेल्या ३,०२९ घटनांच्या तुलनेत १७% वाढ झालेली आहे. २०१०-२०१४ या कालावधीमध्ये बेपत्ता झालेल्या ३.८५ लक्ष मुलांपैकी ६१% मुली होत्या. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, गोवा, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात ही गुन्हेगारी पसरलेली आहे. परंतु गुन्हेगार ताब्यात येण्याचं प्रमाण फारच कमी आहे. भारतात ९०% मानवी व्यापार हा देशांतर्गतच होतो व त्यात प्रामुख्यानं मागासवर्गीय समुदायातील मुलांचे बळी पडण्याचे प्रमाण जास्त आहे असे युएस डिपार्टमेंटच्या ‘२०१३- ट्रॅफिकिंग इन पर्सन्स’ या अहवालाद्वारे स्पष्ट होते.
राष्ट्रसंघानं यासंबंधीचा प्रोटोकॉल २५ डिसेंबर २०१३ साली बनवला आहे, ज्याच्या अंतर्गत मानवी तस्करीला बळी पडणा-या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण व मदत करण्याचं सर्व देशांनी कबूल केलं आहे. राष्ट्रसंघानं २०१३ साली १३२ देशांमध्ये सर्वेक्षण करून यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. लैंगिक शोषण, गुलामगिरी, भीक मागायला लावणं, गुन्हे, अवयव विक्री आणि इतर काही कारणांसाठी मानवी तस्करी केली जात असल्याचं त्यात म्हटलं आहे. अत्याधिक दारिद्र्यता, सामाजिक-आर्थिक स्थिती, जागरूकतेचा अभाव, निरक्षरता, शासकीय धोरण अमलबजावणीचा अभाव या बाबी बाल व्यापाराला Child Trafficking ला कारणीभूत सिद्ध होतात. विशेषत: २००७ सालानंतर मानवी व्यापाराचं प्रमाण गंभीररीत्या वाढलं आहे. आजघडीला १३६ देशांमधील माणसं मानवी व्यापाराला बळी पडून त्यांची रवानगी जगातील इतर ११८ देशांमध्ये झाल्याचं उघडकीस आलं आहे. मात्र यातील गुन्हेगार उघडपणे वावरत नसल्यानं त्यांचे गुन्हे उघडकीस येत नाहीत व या गुन्हेगारी क्षेत्राच्या टक्केवारीचं प्रमाण अद्याप कोणत्याही देशाला पूर्णपणे सांगता आलेलं नाही. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम म्हणजे युएनओडीसीच्या गेल्या वर्षीच्या अहवालानुसार जगभरात लहान मुलांच्या तस्करीचं प्रमाण १,२६,००० इतकं आहे.
बाल व्यापार – मानवी व्यापार ह्या प्रकारची चाहुल आपल्याला जेव्हा लागते त्यावेळी आपण दुर्लक्ष करतो कशाला आपण बोलायचे कशाला आपली दुश्मनी वाढवुन घ्यायची असे करून आपण आपल्या जबाबदारी पासुन, सामाजिक दायीत्वा पासुन दूर राहतो. नेमके ह्यामुळे Child Trafficking बाल व्यापार, Human Trafifiking मानवी व्यापार करणा-यांची प्रवृत्ती वाढीला लागते.
बाल व्यापार म्हणजे मानवी हक्काचे उलंघन असून यात बालकांचे पुनर्वसन हा महत्वपूर्ण संवेदनशील विषय आहे. हा जागतिक चिंतेचा प्रश्न असून, महाराष्ट्र तर या मानवी वाहतुकीचे उगमस्थान, संक्रमण क्षेत्र व अंतिम लक्ष्य बनले आहे. केवळ आर्थिक नफ्यासाठी केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर व्यापाराविरोधी तीव्र लढा उभारला पाहिजे. पिडीत बालकाला वेगवेगळ्या पातळीवर शोषणाला सामोरे जावे लागल्यामुळे मानसिक/भावनिकस्तरावर समजून घेवून सामान्य आयुष्याप्रती प्रोत्साहित करण्याची गरज असते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या व मानवी हक्कापासून वंचित असणाऱ्या महिला व मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देऊन, आरोग्यपूर्ण, सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी कायद्याबरोबरच मानवी व्यापारासारख्या संघटित गुन्हेगारीवर गाव, शहर, राज्यपातळीवर जनजागृती, प्रबोधन, सक्षमीकरण, प्रतिबंध, पुनर्वसन याविषयी संवेदनक्षमता निर्माण करणे जसे आवश्यक आहे, तसेच या चळवळीत प्रत्येकाचा सकारात्मक सहभागही आवश्यक आहे.
अशा प्रकारच्या कोणत्याही घटना लक्षात आल्यास पोलीस पाटील, पोलीस स्टेशन, आपल्या विश्वासातील कोणत्याही व्यक्तीला घटनेबद्दल माहिती |k व पुढे काय होत आहे निरीक्षण करीत रहा.
नक्कीच आपण हे सर्व थांबवु शकतो.
डॉ. मधुकर गुंबळे
संचालक
अपेक्षा होमिओ सोसायटी/Child Rights Alliance
Email- apekshasociety@gmail.com Mob. No. 9422190811