‘देवाघरची फुले’ म्हणून धरतीवर आलेल्या निष्पाप जीवांवर; त्यांच्या अबल असण्याचा गैरफायदा घेत अनेक प्रकारे त्यांचे शोषण चालते, हे विदारक असे हादरवून टाकणारे सत्य आहे. मुलांचा लैगिक छळ हा आपल्या समाजात असलेल्या दष्ट्रांतापैकी सर्वात हीन आणि दुर्लक्षित बाब आहे. मुलांचे बालपण हिरावून घेणाऱ्या अपकृत्याच्या घटना समाजात घडताना दिसतात परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे निषिध्द मानले जाते. त्यामुळे सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.
बालकांचे शोषण म्हणजे नक्की काय?- ज्याद्वारे बालकाला शारीरिक/मानसिक हानी पोहचेल असा संपर्क/ स्पर्श/ कृती/ भाषण/ वर्तन आणि अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल ते बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. कोणत्याही धर्म, वर्ण, वंश, लिंग वा सामाजिक/ आर्थिक स्तरातील मूल हे शोषणाला व अवहेलनेला बळी पडू शकते.
युनिसेफ व भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने २००७ साली केलेल्या “बाल शोषणावर एक अध्ययन: इंडिया २००७” सर्वेक्षणानुसार काही धक्कादायक आकडेवारी पुढे आली. नमुन्यादाखल १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांत ६९% मुलांचे शारीरिक शोषण होत होते. तर सर्वेक्षणानुसार दर ३ मुलांमधील २ मुले शारीरिक शोषणाला बळी पडतात हे दिसून आले. रस्त्यावर राहणारी मुले, बालमजूर आणि संस्थागत देखभालीत असलेल्या मुलांनी सर्वात जास्त लैंगिक स्वरूपाच्या हल्ल्यांचे प्रमाण नोंदविले आहे.
भारतातील लहान किंवा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल माहिती घेण्याचा, त्याविषयी सतर्क होण्याचा व प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. मुलांचा लैंगिक छळ हा जाती, धर्म, मूळ यावर मुळीच अवलंबून नाही व हे खेड्यात व शहरात दोन्हीकडे दिसून येते. याला जबाबदार असणारी व्यक्ती ९०% त्यांच्या परिचयाची वा ओळखीची असते. अशी परिचित व्यक्ती आपल्या ओळखीचा, हुद्द्याचा व विश्वासाचा फायदा घेते आणि अश्लील कृत्ये करते. मुलांवरच्या लैंगिक अत्याचारामध्ये जबरदस्ती क्वचित होते. गोड बोलून, आमिष दाखवून मुलाला हळूहळू त्या कृत्यात सामील करून घेतलं जातं. ‘हे आपलं गुपित, कोणाला सांगायचं नाही,’ असं म्हणून, तर कधी कुणाला हे सांगितलं तर तुझ्या आईवडिलांना किंवा आवडत्या व्यक्तीला मारून टाकीन किंवा तुलाच लोक वाईट ठरवतील, असं सांगून मुलांना गप्प केलं जातं. बऱ्याच वेळा मुलांना माहिती असल्यावरही, कुटुंबातील संबंध बिघडण्याची भीती किंवा मुलांच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ह्या भीतीने सहन केल्या जाते. घरातील मुख्य पुरुष / मोठा माणूस समाजाच्या, कुटुंबाच्या भीतीने ह्याकडे दुर्लक्ष करत राहतो.
बाल शोषणावर प्रतिबंध घालायचा असेल तर जबाबदार व्यक्ती म्हणून शाळेत/घरी मुलांना काही बाबींची माहिती प्रामुख्याने माहिती करून देणे गरजेचे आहे. तसे- मुलांना चांगला/वाईट स्पर्श (Good touch-Bad touch)संदर्भात माहिती होणे तसेच यातील फरक स्पष्ट होणे आणि शोषणाचे प्रकार आणि लक्षणे याबाबत मुलामध्ये जागरुकता येणे हि काळाची गरज आहे. माझे शरीर हे माझ्या मालकीचे, त्याला चुकीचा स्पर्श करण्याचा, इजा करण्याचा अधिकार कुणालाही नाही हि भावना मुलामध्ये रुजायला पाहिजे. तसेच एखाद्याच्या स्पर्शाचा राग आला, विचित्र वाटले तर लगेच आपुलकीच्या व्यक्तीला सांगायचे. मुलांना हे शब्द लक्षात ठेवायला व गरज पडल्यास वापरायला सांगा : नाही, पळून दूर जा, ओरडा, सांगा. त्यांना कोणी नकोशा पद्धतीने स्पर्श केला किंवा अनोळखी वा ज्या व्यक्तीविषयी त्यांना खात्री वाटत नाही अशा व्यक्तीबरोबर जायला सांगितले तर त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला पाहिजे. संकटात सापडलेल्या मुलासाठी चाइल्ड हेल्पलाईन तर्फे प्रत्यक्ष मदत, वैद्यकीय मदत, निवारा, शोषणापासून संरक्षण इत्यादी अनेक बाबतींत मदत मिळते, तसेच फोनवरून सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशनही केले जाते. त्यामुळे अश्या प्रसंगी मुलांना चाइल्ड हेल्प लाईनचा क्र. १०९८ कसा वापरायचा या बाबत माहिती करून द्यावी.
बालकांच्या विरोधात घडणाऱ्या लैंगिक गुन्ह्यासाठी “लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम २०१२” हा सर्व समावेशक कायदा अस्तित्वात आहे. या कायद्या मध्ये बाल लैंगिक शोषणाच्या ठोस व्याख्या असून त्यानुसार बालकांच्या लैंगिक गुन्हे, जशी पोर्नोग्राफी, लैंगिक छळ, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून ह्या विधेयकात तरतुदी आहेत तसेच जलद न्याय मिळण्यासाठी जलदगती न्यायालयांची सोयही सुचविली आहे.
भारतीय संविधानाने बालकांना हक्क दिले आहेत मात्र क्षणोक्षणी बालहक्काचे हनन होताना आपल्याला दिसते म्हणूनच बाल हक्काचे संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा जरी उचलला तरी आपण समाजात मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून त्यांचे भविष्य उज्वल होण्यास सहाय्य करू शकू. बालकांचे बालपण अबाधित राखून स्वस्थ मन आणि आरोग्यपूर्ण शरीराचे सुजाण नागरिक होण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. “तू नव्या युगाची आशा तु ऊ|kचे भविष….” असे जेव्हा आपण मुलांना म्हणतो तेव्हा त्यांच्या बालपणाच्या आणि स्वप्नाच्या पायाभरणी मध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका असते. म्हणून चिमुकल्या पंखाना उभारी देण्यासाठी आपण त्यांना संरक्षित बालपण, सुरक्षित समाज देवूया…
डॉ. मधुकर गुंबळे
अपेक्षा होमिओ सोसायटी आणि Child Rights Alliance
संपर्क कर. ९४२२१९०८११, Email- apekshasociety@gamil.com